http://upekshit.blogspot.in/2013_11_01_archive.html
भास...आभास.... कि अमानवीय !!!
भाग - 2
आज बरयाच दिवसाने काहीतरी सुचत आहे, कथेला उशीर होत आहे हे मान्य आणि
त्याबद्दल दिलगीरी सुद्धा व्यक्त करतो पण उगाच काहीतरी ओढून ताणून लिहायचे म्हणून
लिहायचे आणि तुमची फसवणूक करायची याला काही अर्थ नाही, असो...
संध्याकाळी लवकर म्हणजे जवळ जवळ ६ वाजता तात्या आणि त्यांच्या पत्नी राधा सर्व
स्वयंपाक आटोपून घाईने आमचा निरोप घेऊन गेले सुद्धा, इतकावेळ त्यांच्यामुळे आम्ही दोघेही जरा निवांत होतो पण ते दोघे गेल्यावर
मात्र आमची थोडी टरकली पण मनावर आलेले भीतीचे सावट घालवावे तर लागणार होते आणि
त्यामुळे आम्ही बीचवर भटकायला जे बाहेर पडलो ते साधारण ९ वाजता परतलो फिरण्याने
भूकही लागली होती त्यामुळे फ्रेश होऊन लगेच जेवण करायला गेलो शलाकाला चेंज म्हणून
तिला आज मी सर्व करणार होतो त्यामुळे सर्व करायला भांड्याचे झाकण उघडले आणि
अक्षरशः धक्का बसला मला...
आता पुढे ...
डोळ्यासमोर जे दिसले ते बघून चक्कर यायची
बाकी होती, मला यायला वेळ लागला म्हणून शलाकापण आत आली आणि तिच्या किंकाळीने तेथील
भयाण शांतता भंग पावली कारण आतली सर्व भांडी अगदी रिकामी आणि घासूनपुसून स्वच्छ
करून ठेवली होती म्हणजे तात्या आणि त्यांच्या पत्नीने काही बनवलेच नव्हते ? पण असे
कसे होईल ? कारण दुपारपासून तात्या आणि त्यांची मंडळी यांची चाललेली लगबग आम्ही
बघत होतो, आलेले विचार दूर सारून मी शलाकाकडे धावलो आणि तिला आधी बाहेर नेऊन तिला
धीर देऊ लागलो (आणि स्वतःला सुद्धा), झालेला प्रकार इतका धक्कादायक होता कि
जेवायची वासनाच गेली होती आमची पण आता जर तसेच बसून राहिलो तर डोके नक्कीच भंजाळून
गेले असते त्यामुळेo मी शलाला बाहेर डिनर साठी यायला रेडी केले.
दाराला कुलूप लावून आम्ही आंजर्ले रोडवर
अप्पा काणेंच्या घरगुती खानावळीत जेवायला आलो हि खानावळ आम्हाला वर्तकांनी सांगून
ठेवली होती बुकिंग करायच्या वेळी त्यामुळे मनोमन वर्तकांचे आभार मानत जेवायला
सुरवात केली. साधे पण रुचकर जेवण होते पोळी, कोकणस्थी पद्धतीची गोडसर आमटी, मस्त
कवळ्या फणसाची भाजी आणि गरमागरम भात तेही केळीच्या पानावर त्यात तोंडी लावायला ताज्या
आंब्याचे लोणचे नाही नाही म्हणता भरपेट जेवण झाले त्यात अप्पांनी आणि त्यांच्या
घरच्यांनी अगदी आग्रह करकरून जेऊ घातले अगदी घरच्यासारखे त्यामुळे मगाचा तणाव
कुठल्याकुठे पळून गेला, नाही म्हणायला जेव्हा अप्पांना आम्ही वर्तकांच्यात उतरलो
आहे हे सांगितले तेव्हा थोडा वेळ त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता आणि
नाराजी झळकून गेली पण काही क्षणच नंतर परत सगळे निवांतपणे बोलू लागले.
पण शलाका मात्र अजून तो धक्का पचवू शकत
नव्हती कदाचित इथून थोड्यावेळाने परत तिकडे जायचा ताण तिला सहन होत नसावा.
अप्पा काणे साधारण साठीला आलेले गृहस्थ, व्यासंगी माणूस खासकरून अध्यात्म या
विषयावर बोलताना ते विशेष खुलुन आले होते. अप्पा रामदासांचे सच्चे भक्त होते.
त्यामुळे खूप दिवसांनी जेवायच्या आधी त्यांच्या खड्या आवाजातील मनाचे श्लोक कान
आणि आत्मासुद्धा तृप्त करून गेले.
अप्पांच्या चाणाक्ष नजरेने शलाकाची अस्वस्थता बरोबर हेरली. जेवण झाल्यावर
त्यांनी खुणेनेच चल शतपावली करायला म्हणून बाहेर नेले फिरता फिरता अप्पांनी मूळ
विषयालाच हात घातला. मी सुद्धा त्यांना थोड्यावेळापूर्वी घडलेला प्रकार आहे तसा
सांगून टाकला. त्यानंतर अप्पा खूपच गंभीर झाले. अप्पांना नक्कीच काहीतरी माहित
असावे त्या घराबद्दल जे त्यांना मला सांगता येत नसावे अथवा जाणीवपूर्वक ते मला
त्यापासून दूर ठेवत असावे. कारण मी खोदुन खोदुन विचारून सुद्धा ते फ़क़्त इतकेच
बोलले ‘ माणसाच्या आणि विज्ञानाच्या मर्यादा जिथे संपतात तिथे अध्यात्माची आणि
नकारात्मक गोष्टींची सुरवात होते’.
गोष्ट काहीतरी गंभीर असावी असे
आता मला वाटू लागले होते कारण अप्पा सारखे मला आत्ताच तिकडून आमच्या इथे शिफ्ट
व्हा म्हणत होते, पण मी सुद्धा इरेला पेटलो होतो मी अप्पांना स्पष्टपणे सांगितले
कि जोवर मला तुम्ही काही सांगत नाही तोवर मी इथे येणार नाही अर्थात अप्पांचा आदर
ठेवूनच मला हे सांगावे लागले. मी ऐकत नाही हे बघून शेवटी अप्पा मला सगळे सांगायला
तयार झाले पण रात्र बरीच झाल्यामुळे आधी मी त्यांच्या घरी शिफ्ट व्हावे असा
प्रस्ताव त्यांनी मांडला आणि तो मी लगेच मान्य करून टाकला.
मी आणि शलाका आमच्या बॅग्स आणायला निघालो, खरे तर मी एकटे जावे असे अप्पांना
वाटत होते पण शलाका मला एकट्याने सोडायला तयार नव्हती. गाडीत बसायच्या आधी अप्पा
हळूच माझ्या जवळ आले आणि तुझा विश्वास असो नसो माझ्या समाधानासाठी हे ठेव असे
म्हणून त्यांनी केळशीच्या गणपतीचा अंगारा माझ्या हातात बळजबरीनेच दिला आणि शलाकाला
जपण्याची सक्त ताकीद दिली.
तिथून मी जरा घाईनेच गाडी काढली आणि तसे करताना हातातील ती अंगारयाची पुडी कधी
चुकून हातातून बाहेर पडली ते समजलेच नाही.
गाडीत का कुणास ठाऊक मन थोडे विचलित होऊ लागले होते अप्पांचे म्हणणे टाळून मी
काही चूक तर नाही ना करत आहे ? या तंद्रीतच परत वर्तक निवास मध्ये कधी आलो ते
समजलेच नाही समोर अंधारात ते घर बघून नकळत अंगावर काटा आला, माझी हि अवस्था तर
बिचारी शलाकाची काय अवस्था असेल असे म्हणून मी शेजारी पहिले मात्र आता किंचाळायची
पाळी माझी होती कारण क्षणापुर्वी माझ्या शेजारच्या सीट वर असलेली शलाका आता तिथे
नव्हती....
शलाकाच्या काळजीने
मी तसाच घराकडे धावलो तर हि दार उघडून माझीच वाट पाहत होती जणू, शलाका आत्ता जरा
वेगळीच वाटत होती मला, म्हणजे नेहमीची साधी, नाकासमोर चालणारी ‘ती’ आज ..आज थोडी
खोडकर वाटत होती कसलीतरी उत्कटता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिच्या नजरेत एक
आव्हान दिसत होते, समर्पणाची आतुरता दिसत होती. एक क्षण मला काळजीच वाटली पण नंतर
मी विचार केला कि कदाचित खूप दिवसाने आम्हाला इतका निवांतपणा मिळालाय म्हणून ती
जरा खुलून आली असेल.
पण... कधी कधी
माणसाच्या आयुष्यात या ‘पण’ ला खूप महत्व असते कारण या गडबडीत मी गाडीच्या मागच्या
सीट वर नजर टाकली असती तर कदाचित...
---------------------------
आपला